21
परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे मुलगे, जे याजक त्यांना असे सांग की मेलेल्या माणसाला र्स्ण्श करुन याजकाने स्वतःला अशुद्ध करून घेऊ नये. परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ, आणि आपल्या जवळ असलेली आपली अविवाहित बहीण ह्यांच्या प्रेताला स्पर्श केल्यास हरकत नाही. याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य माणसाप्रमाणे स्वतःला अपवित्र करुन घेऊ नये.
“याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत; त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नांवाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.
“याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये. याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे; कारण तो पवित्र वस्तू देवाकडे घेऊन जातो! तो देवाला पवित्र अन्नार्पण करतो आणि मी पवित्र आहे.
“एखाद्या याजकाची मुलगी वेश्याक्रम करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करुन घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाच्या पावित्र्याला काळिमा लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
10 “आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक ह्या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांच्यात शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत; 11 त्याने आपणाला अशुद्ध करुन घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या बापाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये. 12 त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
13 “त्याने कुमारिकेशीच लग्न करावे, 14 भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे. 15 अशा प्रकारे त्याने आपल्या लोकांत आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये;\f + \fr 21:15 \fk संतती भ्रष्ट होऊ देऊ नये किंवा“त्याची मुले लोकांकडून अशुद्ध होणार नाहीत.”\f* कारण मी जो परमेश्वर त्या मी त्याला पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
16 परमेश्वर मोशेला म्हणाला, 17 “अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यामध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग-शारीरिक दोष-निघाले तर त्याने आपल्या देवाकरिता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये. 18 शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही माणसाने मला अर्पण आणू नये; याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला, 19 मोडक्या पायाचा, थोटा, 20 कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
21 “अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वराला अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊं नये; 22 तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे; 23 परंतु त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परम पवित्र स्ताने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
24 तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे मुलगे व सगळे इस्राएल लोक ह्यांना हे सर्व सांगितले.