5
1 बलशाली नगरी, आता तुझे सैनिक गोळा कर.
ते आपल्यावर हल्ला करण्यासाठी सभोवती जमा होत आहेत.
ते आपल्या काठीने इस्राएलच्या न्यायाधीशाच्या
गालावर प्रहार करतील.
2 बेथलहेम एफ्राथा,
तू यहूदातील सर्वात लहान गाव आहेस.
तू इतका लहान आहेस की
तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही अशक्य आहे.
पण “इस्राएलचा राज्याकर्ता” माझ्यासाठी तुझ्यातून येईल.
त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून, अनंत काळापासून, झाला आहे.
3 परमेश्वर, त्याच्या लोकांना, सोडून देईल.
स्त्री आपल्या मुलाला, वचनदत राजाला जन्म देईपर्यंत.\f + \fr 5:3 \fk स्त्री … देईपर्यंत ह्याचाअर्थ “यरुशलेम (स्त्री) त्रास होईल” आणि मग “नवे यरुशलेमला (मूळ) जन्माला येईल.”\f*
मग त्याचे उरलेले भाऊ
इस्राएलच्या लोकांकडे परत येतील.
4 त्यानंतर इस्राएलचा राज्यकर्ता परमेश्वराच्या सामर्थ्याने उभा राहील.
त्याचा देव परमेश्वर याच्या विस्मयकारीक नांवाल उभा राहील आणि कळपाला चारील.
ते शांतीने राहातील.
का? कारण त्या वेळी परमेश्वराची महानता पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचेल.
5 मग शांती नांदेल.
हो! अश्शूरचे सैन्य आपल्या देशात येईल.
आपल्या भव्य वाड्यांचा ते नाश करतील.
पण इस्राएलचा राज्यकर्ता सात मेंढपाळ
आणि आठ नेते निवडील.
6 ते आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर सत्ता गाजवतील.
निम्रोदच्या भूमीवर, हातात तलवार घेऊन, राज्य करतील.
ते लोकांवर राज्य करण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करतील.
पण इस्राएलचा राज्याकर्ता, अश्शूरीपासून आपल्याला वाचवील.
ते लोक आमच्या देशात येतील
व आमचे भव्य वाडे पायदळी तुडवतील.
7 मग पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक,
परमेश्वराकडून पडलेल्या आणि माणसांवर अवलंबून नसलेल्या दवाप्रमाणे वाटतील.
कोणासाठी पण न थांबणाऱ्या गवतावरच्या
सरीप्रमाणे ते असतील.
8 पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक,
पुष्कळांना, जंगलातील प्राण्यांमधील सिंहाप्रमाणे वाटतील.
मेंढ्यांच्या कळपांत आलेल्या तरुण सिंहाप्रमाणे ते असतील मेंढ्यांच्या कळपातून जर सिंह गेला,
तर तो त्याला पाहिजे तेथेच जातो.
त्याने जर एखाद्या जनावरावर हल्ला केला
तर कोणीही त्या जनावराला वाचवू शकत नाही.
वाचलेले लोक असेच असतील.
9 तुम्ही तुमच्या शत्रूंवर हात उचलाल
आणि त्यांचा नाश कराल.
10 परमेश्वर म्हणतो,
“त्या वेळी, मी तुमचे घोडे काढून घेईन.
तुमचे रथ नष्ट करीन.
11 तुमच्या देशातील गावांचा मी नाश करीन.
तुमचे सर्व किल्ले मी पाडून टाकीन.
12 तुम्ही यापुढे जादूटोणा करण्याचा प्रयत्न करणार नाही.
तुमच्यात यापुढे भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणारे नसतील.
13 मी तुमच्या खोट्या देवाच्या मूर्ती नष्ट करीन.
त्या खोट्या देवांचे स्मारकस्तंभ मी पाडून टाकीन.
तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
14 अशेराच्या पूजास्तंभांचा मी नाश करीन.
मी तुमच्या खोट्या देवांचा नाश करीन.
15 काही लोक माझे ऐकणार नाहीत.
पण मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करीन.
मी त्यांचे उट्टे काढीन.”