2
सर्वांत प्रथम मी कळकळीने विनंति करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व माणसांच्या वतीने करावे. आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की, आम्हांला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. कारण फक्त एकच देव आहे. आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे: तो म्हणजे ख्रिस्त येशू जो स्वतःमनुष्य होता. सर्व लोकांच्या पापांची खंडणी म्हणून त्याने स्वतःला दिले. अशा प्रकारे देवाच्या योजनेविषयी त्याने योग्य वेळी साक्ष दिली. आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा विदेशी लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.
म्हणून प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. ते प्रार्थना करीत असताना त्यांनी आपले हात उंचवावेत, जे देवाला पवित्र असे आहेत. व असे न रागावता व न भांडण करता करावे.
त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला साध्यासुध्या वेशाने, नम्रतेने, मर्यादेने, शोभित करावे. त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या केसरचना करु नयेत. तसेच सोने, किंवा मोती किंवा महाग कपडे वापरु नयेत. 10 उलट देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करणे अगदी योग्य आहे.
11 स्त्रीने शांतपणे, पूर्ण अधीनतेने शिकावे. 12 मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत राहावे. 13 मी असे म्हणतो, कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला. 14 त्यानंतर हवा. आदाम फसविला गेला नाही तर स्त्री फसविली गेली. आणि ती पापात पडली. 15 परंतु स्त्रिया जर विश्वास, प्रीती, पवित्रता व योग्य आत्मसंयमनात राहिल्या तर बालकाला जन्म देण्यामुळे त्यांचे तारण होईल.